देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील मार्लेश्वर मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री मंदिर फोडण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न झाला. मात्र चोरीसाठी आलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
देवरूख-मार्लेश्वर मार्गालगत आंगवली येथे हे भव्य-दिव्य मंदिर आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातच या मंदिराचा जीर्णोध्दार झाला. मार्लेश्वर तीर्थक्षेत्री जाणारा प्रत्येक भाविक या मंदिरात नतमस्तक होतो. मकर संक्रांतीला मार्लेश्वर तीर्थक्षेत्री आंगवली श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरीजा देवी यांचा विवाह सोहळा थाटात पार पडतो. मार्लेश्वर मंदिरात मार्लेश्वर देवो विवाहापूर्वी विधी 3 दिवस सुरू असतात. विवाह सोहळ्यासाठी या मंदिरातूनच मार्लेश्वर देव पालखीतून तीर्थक्षेत्री प्रयम करतो.
या मंदिरात शुकवारी रात्री 12.30 वाजता चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला. सभागृह व मंदिराचा मुख्य दरवाजा चोरट्याने हत्याराच्या सहाय्याने फोडला. मंदिरात प्रवेश करताच या चोरट्याचा अंगावर लाईट पडल्याने हा चोरटा निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. शनिवारी सकाळी पुजारी मंदिरात पूजेसाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.