संगमेश्वर:-मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेद खुर्द येथे बसने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चुराडा झाला. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. अनंत लक्ष्मण मांडवकर (कुरधुंडा, मांडवकरवाडी ) असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. हा अपघात सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
सविस्तर वृत्त असे की, अनंत मांडवकर हे आपल्या ताब्यातील रिक्षा ( MH.08/AQ/5377 ) ने संगमेश्वरला जात होते. ते आंबेड खुर्द येथे आले असता रिक्षा वळवुन रस्ता पलीकडच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या एस.टी. बस ( MH.08/ AP/5729) वरील चालक बालाजी वैजनाथ मडुळे (रा.मु. पो गंगापुर ता.जि. लातुर) याने रिक्षाला मागुन जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले. तसेच रिक्षा चालक अनंत मांडवकर गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करीत आहेत.