निलेश कुळ्येवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
लांजा : लांजा तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर घेऊन जाणाऱ्या तालुक्यातील तरुणाने गावाचे नाव रोशन केले आहे. दक्षिण कोरियामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील निलेश नंदकिशोर कुळ्ये याची निवड झाली आहे. ही निवड अथलांटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केली आहे. भारताचे प्रतिनिधित्वासाठी निलेश याची निवड होताच लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्हा क्रीडा क्षेत्राचा आलेख उंचावला आहे.
देशाचे प्रतिनिधित्व करण्याची निवड होताच निलेश कुळ्ये याच्यावर लांजा तालुक्यासह जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशासाठी खेळण्यासह प्रतिनिधित्व करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या निलेशचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्य, मेहनत, मार्गदर्शक आणि जिद्दीच्या बळावर निलेशने क्रीडा जगता मध्ये यशाला गवसणी घातली आहे.
निलेश कुळये सध्या श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक या प्रशाळेवर क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. अथेलेंटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अल्ट्रा आणि ट्रायल रनिंग सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष नागराज आदीया व सेक्रेटरी रवींद्र चौधरी यांनी निवड केली असून तसे पत्र कुळ्ये याला प्राप्त झाले आहे.
दक्षिण कोरिया येथील उलजूगुन उल्लसान या शहरामध्ये २३ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत या आंतरराष्ट्रीय रनिंग स्पर्धा संपन्न होणार आहेत. ही स्पर्धा महिला आणि पुरुष गटात होणार असून भारत देशातून २ महिला आणि ८ पुरुष सहभागी होणार आहेत. यामध्ये पुरुष गटातून सहभागी झालेल्यांचे प्रतिनिधीत्व लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील निलेश कुळ्ये हा करणार आहे.