राजापूर : तालुक्यातील पडवे स्टॉप येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 1 लाख 91 हजार 876 रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना बुधवार 17 जुलै रोजी सायंकाळी 4.30 ते रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्यादी संतोष सहदेव ठुकरूल (रा. पडवे, राजापूर) यांनी नाटे सागरी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव ठूकरुल व त्यांची पत्नी घराला लॉक लावून बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वडीलांचे वर्षश्राद्ध कार्यक्रम असल्याने पडवे ठुकरूलवाडी येथील जुन्या घरी गेले होते. रात्री 11.30 वाजण्याच्या दरम्याने पडवे स्टॉप येथील घरी आले असता घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
अज्ञाताने घरातील बाथरुमच्या काचा काढून घरात प्रवेश करुन घरातील टिव्ही शोकेशच्या कपाटातील पिशवीत ठेवलेले सुमारे 1 लाख 91 हजार 876 किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे संतोष ठुकरूल यांनी नाटे पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.
या दागिन्यांमध्ये 1 लाख 63 हजार 750 रूपये कींमतीचे 7.230 मिलीग्रॅम वजनाचे मंगळसुत्रातील पेडल व 44.440 मिलीग्रॅम वजनाचे पाच पदरी त्यात काळे मणी असलेले मंगळसुत्र असे मिळून एकूण वजन 51.67 मिलीग्रॅम जुने वापरते 25 हजार 926 रुपये किमतीचे कानातील जोड टॉप त्याचे वजन 8.610 मिलीग्रॅम वजनाचे जुने वापरते 2 हजार 200 रुपये किमतीची सोन्याची नथ जुनी अशा सुमारे 1 लाख 91 हजार 876 रूपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे फिर्यादित नमुद केले आहे.
या प्रकरणी नाटे पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (क), 331(3), 331(4) अन्वये अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नाटे पोलीस अधिक तपास करत आहेत.