मुंबई : हल्ली अनेकांच्या घरात श्वान अर्थात कुत्रा हा प्राणी असतोच. गावा-खेड्यांकडे तर अनेकांनी विविध जातीचे कुत्रे पाळले आहेत. कुत्रा म्हटले की सर्वात पहिल्यांदा आठवतो तो लॅब्राडोर जातीचा कुत्रा.
हा कुत्रा दिसायला जितका छान असतो तितकाच तो हुशारही असतो. पण सिंधुदुर्गातील याच जातीच्या कुत्र्याने एक असा कारनामा केला, ज्यामुळे त्या कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याच्या मालकाला थेट मुंबई गाठावी लागली. सिंधुदुर्ग येथे एका लॅब्राडोर कुत्र्याने घराच्या अंगणात पडलेल्या सोड्याच्या बाटल्यांचे झाकण गिळले, ज्यामुळे या कुत्र्याला मुंबईतील रुग्णालयात आणून त्याच्यावर तीन तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
कुत्रे हुशार असले तरी त्यांना लहानपणापासूनच अनेक गोष्टी शिकवाव्या लागतात. मात्र, काही कुटुंब त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्यांचा अतिलाड करतात आणि मग ते कुत्रे मोठे झाले की त्यांना सांभाळणे कठीण होऊन बसतात. तर मालकही वयस्कर होऊ लागले की त्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना बंधनात ठेवता येत नाही. असाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गात घडला आहे. सिंधुदुर्गातील एका कुत्र्याने तब्बल 12 सोड्याची झाकणे गिळली. यानंतर या कुत्र्याने त्याला त्रास होऊ लागल्याने उलटी करून दोन झाकणे बाहेर काढली. पण इतर झाकणे त्या कुत्र्याच्या पोटातच अडकल्याने त्याला सतत उलटी येत होती. तर यामुळे त्याचे जेवणही सुटल्याने त्या कुत्र्याला त्याच्या मालकाने उपचारासाठी मुंबईत आणले.
मुंबईत या कुत्र्याला उपचारासाठी आणल्यानंतर महालक्ष्मी येथे नव्याने सुरू झालेल्या प्राण्यांच्या रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. या ठिकाणी त्या कुत्र्याचे एक्सरे काढले असता त्यामध्ये कुत्र्याच्या पोटात दगड असल्याचे दिसले. ज्यानंतर या कुत्र्याची एंडोस्कोपी करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पण महालक्ष्मी येथील रुग्णालयात एंडोस्कोपी करण्यात येत नसल्याने त्याला परळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. 15 जुलै) परळ येथील रुग्णालयाने या कुत्र्यावर शस्त्रक्रिया न करता त्याच्यावर एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयानुसार तीन तास एंडोस्कोपी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत कुत्र्याला भूल देण्यात आली होती. ज्यानंतर या कुत्र्याच्या पोटातून डॉक्टरांनी 12 सोड्याच्या बाटलीची झाकणे आणि दोन दगड काढले. ज्यामुळे या कुत्र्याला डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.