खेड:तालुक्यातील ग्रामीण भागात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढलेले असतानाच शहरातही डेंग्यू साथीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील जामगे, आंबवली, फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ डेंग्यूसदृश रुग्ण सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभाग सतर्क झाला असून साथग्रस्त गावांमध्ये सर्वेक्षणाची मोहीम सुरूच ठेवली आहे. शहरातही ३ डेंग्यूसदृश रूग्ण सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील फुरूस येथे ८ डेंग्यूसदृश रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. यातील काही रूग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत साथग्रस्त गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जागमे, आंबये, फुरूस याठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाची मोहीम सुरू असून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यावर दिला जात आहे. शहरात सद्यस्थितीत ३ डेंग्यूसदृश रूग्ण सक्रिय आहेत. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले व कर्मचारी साथीवर विशेष लक्ष ठेवून आहेत.