गुहागर:-तालुक्यातील वरवेली बौद्धवाडी फाटा ते बौद्धवाडी मार्गे शिंदेवाडी फाटा रस्त्याची दुरावस्था झाली असून या मुख्य रस्त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळयात या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते.
या रस्त्यावरून संपुर्ण गावांतील नागरिकांची रहदारी असते. या रस्त्यांवर बौद्धवाडी, मधली शिंदेवाडी, भुवडवाडी, गावडे अवेरे वाडी, रावंणगवाडी, बाळ शिंदेवाडी अशा वाडीतील नागरिकांची वस्ती आहे. या नागरिकांनी अनेकवेळा रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात तसेच नव्याने डांबरीकरण करण्याबाबत अनेकवेळा पंचायत समिती व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदन व मागणी केली होती.
गेल्यावर्षी तर या रस्त्यासाठी येथील नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने फक्त ग्रामस्थांना आश्वासन देऊन हा विषय थांबवला परंतु या रस्त्यावर एक रुपया सुधा खर्च पडला नाही.येथील आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सुद्धा येथील नागरिक गेली दहा वर्ष रस्त्याच्या डाबरीकरणाची मागणी करत आहेत.परंतु यावर कोणतेही कार्यवाही करण्यात आले नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे वरवेली येथे लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये लोकांनी मतदान केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आले होते. त्यावेळी नागरिकांनी या रस्त्याची झालेली दुरावस्था सांगितली आहे. या रस्त्याला दुतर्फा गटारे नसल्याने पावसाळ्यात या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्याकडे येणारे अन्य रस्त्याना गटारे नसल्याने या रस्त्यावरूनही पाणी सतत वाहत असते. या रस्त्यावरुन कायम रहदारी असते. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना नागरीकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो.या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. उन्हाळ्यात या रस्त्यावर नागरिकांनी माती टाकून थोडेफार खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला परंतु पावसाळ्यातील सर्व माती वाहून गेली असून संपूर्ण रस्त्याला खड्डेच खड्डे पडलेले दिसून येत आहेत. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे होऊन सुद्धा आजही ग्रामीण भागामध्ये अनेक सोयी सुविधांची वानवा आहे. आजही या सोयी सुविधांसाठी नागरीकांना झगडावे लागत आहे. तीच अवस्था या गावाची असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना अधिकाऱ्यासह लोकप्रतिनिधींच्या दाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. तर उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणी लक्ष देईल का हाच सवाल येथील नागरिक विचारत आहेत.