नवी दिल्ली:-केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे.
शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले होते. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह स्वीकारावं लागलं. तसेच त्यांना पक्षाचं नावही बदलावं लागलं. शिवसेना फुटीनंतर पक्षनिधीचा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोग आणि न्यायालयात गेला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती. यानंतर पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर काल (गुरुवार) केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली.
याआधी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात देखील फूट पडून दोन गट निर्माण झाले होते. तेव्हा मूळ पक्ष अजित पवार गटाकडे गेला. तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस -शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव आणि तुतारी चिन्ह म्हणून स्वीकारावं लागलं होतं. तेव्हाही शरद पवार गटाच्या मागणीनुसार त्यांना पक्ष निधी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. त्याच धरतीवर आता उद्धव ठाकरे यांनाही पक्ष निधी स्वीकारण्यास परवानगी मिळाली आहे.