मालवण:-निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजना ह्या केवळ निवडणुकीचा जुमला आहे. या योजना सत्यात उतरणार नाहीत.
या योजना कशा खोट्या आहेत हे जनतेपर्यंत पोहचवा. हे असेच चालू राहिले तर अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही. म्हणून उध्दव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. आदि शंकाराचार्यांनी सुध्दा उध्दव ठाकरेंना आशिर्वाद दिला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मतभेद विसरून आतापासूनच येणार्या निवडणूकीसाठी कामाला लागा असे आवाहन आ.वैभव नाईक यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. निष्ठा यात्रा सलग ४५ दिवस सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी माणगाव येथील या यात्रेला शिवसैनिक व नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात चांगला कारभार केला. अनेक संकटातुन महाराष्ट्राला वाचविण्याचे काम केले. पण शिवसेना पक्षातील काही आमदारांनी गद्दारी करून विश्वासघात केल्याने त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र आता पुन्हा एकदा सन्मानाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला आहे. त्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे, त्यांचा शुभारंभ माणगाव येथील दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून गुरूवारी करण्यात आला. त्यानंतर माणगाव -तांबळवाडी येथील बाबा परब यांच्या निवासस्थानी निष्ठा यात्रेची पहिली बैठक संपन्न झाली.
यावेळी आ. नाईक म्हणाले की, या महायुती सरकारमध्ये जिल्ह्याच्या नियोजनाकडे कुणाचेच लक्ष नाही. सासोलीत 300/400 एकर जमिन राणे व त्यांच्या मंडळींनी घेतली. याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिकार्यांना झापतात. त्यामुळे या प्रश्नी आपण आपली भुमिका बदलली पाहिजे अन्यथा जिल्ह्यात पुन्हा अराजकता माजण्यास वेळ लागणार नाही. काही लोकांचा गैरसमज झाला आहे, तो गैरसमज आपण दूर करू आणि झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा येत्या निवडणुकीसाठी एकदिलाने कामाला लागू. गेल्या दोन वर्षात आमच्यावर अन्याय झाला, आमचा पक्ष, चिन्ह चोरले गेले. त्याचा वचपा येणार्या निवडणुकीत काढू त्यासाठी सज्ज व्हा, कामाला लागा असे आवाहन आ. नाईक यांनी केले.
यावेळी संजय पडते म्हणाले की, आमचे काय चुकले ? याचा विचार करण्याची गरज आहे. आ. वैभव नाईक व माजी खा.विनायक राऊत कमी कुठे पडले ? असा सवाल संजय पडते यांनी करत लोकसभेतील पराभव विसरा. आता केवळ दोन महिने काम करा, सत्ता महाविकास आघाडीचीच येणार आणि आ. वैभव नाईक मंत्री होणार आहेत. त्यासाठी आता पासूनच कामाला लागा. आंबेरी पुल आ.वैभव नाईक यांच्या पुढाकाराने झाले पण एप्रोज रोडचे काम अपूर्ण राहीले, त्यासाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता होती, तो निधी भाजप सरकारने दिला नाही हे लक्षात ठेवा आणि प्रामाणिकपणे कामाला लागून वैभव नाईक यांनी तिसर्यांदा आमदार करा असे आवाहन केले. यावेळी सुशांत नाईक म्हणाले की, लोकसभेतील पराभवाचे शल्य आपल्याला आहे.आपल्याला आता एकीने काम करावे लागेल. त्यांची अरेरावी मोडीत काढण्याची गरज आहे. आता स़घटना मजबूत करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपला बुध कसा जिंकेल यासाठी प्रयत्न करा. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल राज्यात सहानुभूती आहे,ही निवडणूक उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची आहे. त्यामुळे कामाला लागा असे आवाहन केले. अमरसेन सावंत म्हणाले की,भावी काळात आपला हक्काचा आमदार नसेल तर काय होईल? हे आपल्याला ज्ञात असेल, त्यामुळे यापुढे आमदारांच्या विजयासाठी एकदिलाने काम करा, लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले असेल तरी खचुन न जाता कामाला लागा असे आवाहन यांनी केले. अतुल बंगे म्हणाले की, लोकसभेत आम्ही गाफील राहीलो, त्यामुळे आपण हरलो.लोकसभेत विनायक राऊत हरले नाहीत तर आपण सर्वजण हरलो तरी यापुढे लोकसभेची पुनरावृत्ती होवू नये, त्यासाठी एकदिलाने विधानसभेसाठी कामाला लागा असे आवाहन केले. सौ.मनिषा भोसले म्हणाल्या की, सर्व सामान्याचा आमदार म्हणून वैभव नाईक यांची ओळख आहे,असाच आपल्याला आमदार हवा,त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा असे आवाहन केले. माणगाव येथील निष्ठा यात्रेला शिवसैनिक व नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.