जाकादेवी /संतोष पवार:-रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगांव येथील रहिवासी असलेले गरीब घराण्यातील शेतकरी प्रकाश सोनू आखाडे यांच्या मालकीच्या घरावरील छत वादळी पावसाने गुरुवार दि.१८ जुलै रोजी सकाळी ६ वा. दरम्याने कोलमडून पडल्याने आखाडे कुटुंबाला ऐन पावसात मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
अतिवृष्टीत घराच्या पडझडीत शेतकरी प्रकाश सोनू आखाडे यांचे सुमारे ३० हजारांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. छतावरील कौले कोलमडून पडल्याने पावसाच्या पाण्यामुळे घरातील अन्नधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सकाळच्या दरम्यान घटना घडल्याने सतर्कतेमुळे घरातील माणसांना कोणतेही दुखापत झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश खोल्ये,उपसरपंच कैलास खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य, तसेच युवा कार्यकर्ते प्रतिक देसाई तसेच तलाठी कार्यालयातील तलाठी सौ. मयुरा परांजपे , ग्रामविकास अधिकारी श्री.शिगवण यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घराच्या पडझडीची पाहणी केली.आपतग्रस्त घरमालक प्रकाश सोनू आखाडे यांना धीर दिला.यावेळी घरची आपत्कालीन परिस्थिती पाहून मालगुंड शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या आपतकालीन निधीतून श्री. प्रकाश सोनू आखाडे यांच्या कुटुंबीयांना जाकादेवी विद्यालयातर्फे ५ हजाराची आपत्कालीन तातडीची रोख मदत देण्यात आली. या मदतीवेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे ,पर्यवेक्षक शाम महाकाळ,ज्येष्ठ शिक्षक संतोष पवार ,क्रीडा शिक्षक संतोष सनगरे, सहाय्यक शिक्षक मंदार रसाळ आदी उपस्थित होते.