राजापूर/तुषार पाचलकर:-बेसुमार वृक्षतोडीमुळे असमतोलपणे पाऊस पडत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणे, पुल व रस्ते वाहून जाणे, मानवी वस्तीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी होणे यासारख्या घटना सातत्याने घडत असल्याने निसर्गाचा समतोल ढासळत आहे.
यावरील एकमेव उपाय म्हणजे, “वृक्षारोपण” असं वक्तव्य मुंबई विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाने घेतलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमां वेळी
श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. येल्लूरे यांनी केलं. पुढे बोलताना त्यांनी उपक्रम स्तुत्य असून निसर्गाचा ढासळता समतोल साधण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. असे उपक्रम घेऊन वृक्षारोपण करून त्या झाडांची जपणूक करूया,”असे आवाहनही त्यानी केले.
श्री.मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘विद्यापीठ स्थापना दिन ‘कार्यक्रमात वृक्षारोपण करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एस.पाटील,प्रा.एम. डी. देवरुखकर,प्रा. पी.पी.राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य र्डॉ. एम.ए. येल्लुरे यांच्या हस्ते फणसाचे रोप लावून करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फणस, आंबा, कोकम अशा रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते..