चिपळूण : रविवारी मुसळधार पावसात शहरात पूरसदृशस्थिती निर्माण झालेली असताना वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहातून मगरीचे पिल्लू वाणीआळीतील एका विहिरीत आले. या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने पिंजरा विहिरीत सोडला होता. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी या पिंजऱ्यात पिल्लाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
रविवारी रात्री वाशिष्ठी, शिवनदी पात्रातील पाण्यात वाढ होऊन त्या पाण्याच्या प्रवाहातून एक मगरीचे पिल्लू वाणीआळी येथील राम मंदिराच्या मागे असलेल्या श्रीधर मालूसरे यांच्या विहिरीत येऊन बसले. पाणी ओसरल्यानंतर ते त्याच विहिरीत राहिले व त्याला वरती येता येत नव्हते. सोमवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मालुसरे यांनी वनविभागास संपर्क साधला असता विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीत मगर पकडण्यासाठी पिंजरा सोडला होता. दोन दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी मगरो पिल्लू पिंजऱ्यात जेरबंद झाले. पिल्लाला पिंजऱ्यासह सुरक्षितरित्या बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हे बचाव कार्य वनपाल डी. आर. भोसले, वनरक्षक राहुल गुंठे, आर. आर. शिंदे, वाहनालक नंदकुमार कदम, संजय अंबवकर, सचिन भैरवकर यांनी केले.