खेड : माटुंगा-मुंबई येथून रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभ धबधब्याखाली 7 मित्र-मैत्रिणींसमवेत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या अवनी संजय कामदार या 27 वर्षीय तरुणीला रीलस बनवणे जीवावर बेतला आहे. धबधब्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरूणीला तब्बल 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाण्याबाहेर काढण्यात आले. उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा मृत्यू झाला.
माणगाव तालुक्यातील अपूर्णावस्थेत राहिलेला निजामपूर जलविद्युत पकल्प, कुंभे बोगदा व मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. कूंभे धबधब्याची साऱ्याना मोहिनी पडत आहे. या धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी माटुंगा-मुंबई येथे वास्तव्यास असलेली अवनी कामदार 7 मित्र-मैत्रिणींसमवेत आली होती. सकाळी 10.30 ते 11 वाजेपर्यंत ती कुंभ धबधब्याच्या पाण्यात रिलस बनवण्याचा आनंद लुटत होती. सेल्फी काढण्यात गुंग असलेल्या अवनीला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ती वाहून गेली.
याबाबत प्रशासनाला माहिती दिल्यानंतर माणगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, तहसीलदार विकास गारूडकर व पोलीस कर्मारी तसा साळुंखे रेस्क्यू टीम, कोलाड रेस्क्यू टीम, सीकेप्स रेस्क्यू टीम, शेलार मामा रेस्क्यू टीम, अबदा रेस्क्यू पथकातील सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. तब्बल 6 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तिला बाहेर काढण्यात यश आले. तिच्या हातापायांसह शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. जखमी अवस्थेत उपचारासाठी तिला माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यानी तिला मृत घोषित केले.