संगमेश्वर : ओमानमध्ये एक तेलवाहू जहाज 15 जुलै रोजी समुद्रात बुडाले होते. या जहाजातील 13 भारतीय नागरिकांसह एकूण 16 जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील एका तरुणाचा समावेश आहे. सम्रान इब्राहिम सय्यद (40) असे त्याचे नाव आहे. ओमान मध्ये बुडालेल्या जहाजात आपला मुलगा आहे असे समजल्यानंतर कसबा येथील त्याच्या कुटुंबीयांना धास्तीने ग्रासले आहे. गेले दोन दिवस बेपत्ता झालेल्यांचा शोध घेतला जात असून ते सापडलेले नाहीत. यामुळे सय्यद कुटुंब चिंतेत आहे.
प्रेस्टींज फाल्कन असे बुडालेल्या जहाजाचे नाव आहे. या तेलवाहू जहाजावर 16 लोक होते. त्यामध्ये 13 भारतीय असून 3 श्रीलंकेचे नागरिक आहेत. या 16 जणांमध्ये 3 जण क्रु मेंबर्स (जहाजावरील कर्मचारी) आहेत.
जहाजावरील सर्वच्या सर्व म्हणजे 16 जण समुद्रात बेपत्ता झाले आहेत. यामध्ये संगमेश्वरातील सम्रान इब्राहिम सय्यद हा देखील होता. तो पाण्यात बेपत्ता झाला आहे. कंपनीच्या माध्यमातून या अपघाताची खबर कसबा येथील सम्रानच्या कुटुंबियांना मंगळवारी मेसेजद्वारे देण्यात आली. त्यानंतर नातेवाईक मंडळी सातत्याने कंपनीच्या संपर्कात आहेत. तो 2 महिन्यापूर्वीच गावी गेला होता.
जहाजावर कामासाठी निघून गेल्यानंतर त्याचा सातत्याने नातेवाईकांशी संपर्क होता. जहाज बुडाल्याच्या वृत्ताने कसबा परिसरात अनेकांना धक्का बसला असून सम्रानच्या कुटुंबियांसह अनेक कसबावासी ओमानमधील ज्या कंपनीचे हे जहाज आहे त्या कंपनीच्या व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क साधत आहेत.