मीठगवाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष विलास चेऊलकर यांची मागणी..
जैतापूर : राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील मीठगवाणे परिसरातील पंचक्रोशी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आषाढी एकादशीचे निमित्त साधत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना मीठगवाणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर म्हणाले, किनारपट्टी भागात दुर्मिळ बनत चाललेल्या उंडल वृक्षाच्या संवर्धनाची आज नितांत गरज आहे.
सागरी महामार्गावरील चिरेखन फाटा ते जैतापूर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा संस्थेचा मानस असून त्याचा शुभारंभ आज चिरेखन फाटा येथे करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विलास चेऊलकर , उपाध्यक्ष एकनाथ आडीवरेकर मीठगवाणे सरपंच साक्षी जैतापकर ,साखर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आनंदा मोरे ,ज्येष्ठ नागरिक श्रीधर पावसकर ,संस्थेचे सचिव रमेश राणे नाटे येथील व्यावसायिक संदेश पाथरे ,पोलीस पाटील गजानन भोगले , सत्यवान कणेरी, सौ सावित्री कणेरी, पत्रकार राजन लाड आदींसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाचे ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक रमेश राणे यांनी केल्यानंतर त्या वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची गरज याबद्दल आनंदा मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सरपंच साक्षी जैतापकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम युवकांसह सर्वांनाच प्रेरणादायी असा आहे असे म्हणत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष विलास चेऊलकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढील वाटचाली विषयी माहिती देतानाच किनारपट्टी भागात दुर्मिळ बनत चाललेल्या उंडल या वृक्षाच्या संवर्धनाची नितांत गरज असून शासनाने कांदळवणाप्रमाणेच या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी केली .या वृक्षाच्या संवर्धनासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची ही तयारी करण्याची ही तयारी ठेवावी अशी विनंती उपस्थितांना केली.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चिरेखन परिसरात वड , पिंपळ अशा वृक्षांचे पूजन करून लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. संस्थेला सामाजिक वनीकरण रत्नागिरी विभागाचे श्री पाटील यांनी विविध वृक्ष देऊन मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान कणेरी यांनी केले.