चिपळूण:- सोमवारी मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसेसना पावसामुळे 3 तास उशीर झाल्याने येथील बसस्थानकात रखडलेल्या प्रवाशांनी रात्री 9.45 वाजता हंगामा केला. अखेर प्रवाशांना चिपळूण बसस्थानकातून एसटी बस उपलब्ध करून दिल्यानंतर वातावरण शांत झाले.
भिवंडी व नालासोपारा या रत्नागिरीकडे येणाऱ्या बसेस चिपळूण बसस्थानकात सायंकाळी 7 वाजेपर्यंत नेहमी पोहोचतात. त्या वेळापत्रकानुसार येथील बसस्थानकात रत्नागिरीला जाणारे प्रवासी थांबले होते. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत असल्याने साहजिकच नेहमीपेक्षा प्रवासी अधिक होते. मात्र पावसामुळे भिवंडी व नालासोपाराहून रत्नागिरीकडे येणाऱ्या बसेस तीन तासानंतरही येथील बसस्थानकात न आल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यांनी पर्यायी बसेसी मागणी केली. मात्र सोमवारी येथील आगारातून रेल्वेच्या प्रवाशांसाठी 16 बसेस सोडण्यात आल्याने अधिकच्या बसेस उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला. अखेर येथील आगाराने रत्नागिरी मार्गावर एक जादा एसटी बस सोडली. तसा उशिराने आलेल्या नालासोपारा बसने संबंधित प्रवाशांना मार्गस्थ करण्यात आले.