चिपळूण-सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची जवळ येथे चार चाकी व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चिपळूण तालुक्यातील पेढे-मोरेवाडीतील रवींद्र बाळू मोरे (45) याचा जागीच मृत्यू झाला. आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरला वारीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या रवीच्या अपघाती मृत्यूचे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली.
रवी हा दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून जात असतो. यावेळीही तो येथील पेठमापातील आपल्या सहकाऱ्याला घेऊन मंगळवारी सकाळी निवासस्थानावरून निघाला. मात्र मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दिघंची पंढरपूर रस्त्यावर उंबरगाव फाट्याजवळ व्हॅगन-आर व रवीच्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तो जागीच ठार झाला. त्याच्या पाठीमागे बसलेल्या सहकाऱ्यासह कारमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्याच्या अपघाती मृत्यूचे वृत्त गावात समजताच अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह ग्रामस्थ तत्काळ आटपाडीला रवाना झाले.
आषाढी वारी रवीची कधीही चुकलेली नाही. दरवर्षी तो आपल्या दुचाकीवरून वारीला जायचा. घरी आर्थिक परिस्थिती बेताची असलेला रवी चिपळूण शहरात सोनारकाम करून आपल्या कुटुंबा उदरनिर्वाह चालवायचा. आईचे गतवर्षी तर वडिलांचे त्यापूर्वी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात भाऊ, पत्नी, पाचवी इयत्तेत शिकत असलेला मुलगा, पहिलीमध्ये असलेली मुलगी असा परिवार आहे.