रत्नागिरी:- एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीदवाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणाऱ्या खारवी विकास संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा हेदवी (गुहागर) येथील अखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचालित खारवी समाज भवनात पार पडली.
यावेळी गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सभेत मागील आर्थिक वर्षातील लेखाजोखा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी मांडला. नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या सभासदांचा संस्थेतर्फे विशेष गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा व्हावी, त्याकरिता त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी आदर्श सेवक म्हणून देवेंद्र कोलथरकर, आदर्श लिपिक म्हणून निखिल आंबेरकर, आदर्श शाखाधिकारी म्हणून सायली भोसले, आदर्श शाखा म्हणून दाभोळ, सर्वाधिक ठेव संकलन करणाऱ्या पालशेत शाखेचे शाखाधिकारी गणेश ढोर्लेकर तर संस्थेच्या वाटचालीसाठी सुरुवातीपासून उत्कृष्ट आर्थिक उलाढाल करणाऱ्या शृंगारतळी शाखेच्या सर्व टीमचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी केले.
पतसंस्थेच्या वर्धिष्णु आर्थिक स्थितीची बलस्थाने, भविष्यातील योजना, सभासदांकडून उत्तम सहभागाची अपेक्षा संस्थाध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केली. सर्व कर्मचारी संस्थेच्या वाटचालीत कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. त्यांना साथ आणि सहयोग सर्व संचालक, समन्वय समिती पदाधिकारी देत असल्यामुळेच संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होऊन संस्था गगनभरारी घेत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सभेकरिता संचालक दिनेश जाक्कर व रमेश जाक्कर, समन्वय समिती सदस्य व पालशेत, शृंगारतळी व दाभोळ शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी संचालक वासुदेव वाघे यांनी आभार मानले.