चिपळूण:-आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला चिपळूणमध्ये प्रथमच अभंगवाणी या कार्यक्रमाची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळणार आहे.
चिपळूणच्या प्रशांत यादव मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत चिपळूणच्या बहादूर शेख नाक्याजवळील सहकार भवनात होणार आहे.
या कार्यक्रमात चिपळूणचे प्रसिद्ध गायक वरद केळकर, सौ. स्मिता करंदीकर, अभिषेक सुतार (पोफळी), तर ठाण्यातील प्रसिद्ध युवा गायिका कु. सृष्टी कुलकर्णी अभंग सादर करणार आहे. या कार्यक्रमाला तबलासाथ निखिल रानडे, ऑर्गनसाथ संतोष आठवले, पखवाजसाथ मंगेश चव्हाण, तालवाद्यसाथ सुहास सोहोनी करणार आहेत. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन ज्येष्ठ रंगकर्मी वामन ऊर्फ राजाभाऊ जोग करणार आहेत.
हा कार्यक्रम राजेंद्र पटवर्धन यांच्या संकल्पनेतून पार पडणार असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीनिवास जोशी करणार आहेत. कार्यक्रम विनाशुल्क असून अभंगवाणीचा आस्वाद चिपळूण आणि परिसरातील रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रशांत यादव मित्रमंडळाने केले आहे.