रत्नागिरी:-मुंबईतील गिरणी कामगार येत्या ९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
गिरणी कामगारांचा प्रश्न गेली ४२ वर्षे प्रलंबित आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनाकडून काही निर्णायक भूमिका घेतली जाईल, अशी अपेक्षा गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना होती.
परंतु संपूर्ण अधिवेशनात कोणत्याही प्रकारचा समाधानाकारक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्य सरकार वारंवार आश्वासन देऊन फसवणूक आपली करत आहे, अशी कामगारांची भावना झाली आहे.
या अन्यायाविरोधात गिरणी कामगार आणि त्यांचे वारस येत्या ९ ऑगस्ट २०२४ पासून न्याय मिळेपर्यंत मुंबईमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. आता आश्वासन नको निर्णय घ्या तेव्हाच उपोषण मागे घेणार, अशी त्यांची भूमिका आहे.
याबाबतचे निवेदन गिरणी कामगारांच्या वतीने रमाकांत बने, हेमंत गोसावी, विवेकानंद बेलुसे, हणुमंत निकम, संभाजी नलगे, अशोक रेवाळे इत्यादींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांना देण्यात आली आहे.