सावंतवाडी:-कोकण रेल्वेमार्गावर सावंतवाडी येथे टर्मिनस होण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता हर घर ईमेल मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी स्थानकात झालेल्या रेल्वे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ईमेल मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा ईमेल मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस का आवश्यक आहे, त्याचा प्रत्यय गोव्यातील पेडणे येथील बोगद्यात नुकत्याच साचलेल्या पाण्यामुळे आला आहे. एक दिवस वाहतूक बंद ठेवावी लागली. अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या दूरच्या अंतराने वळवाव्या लागल्या. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी टर्मिनसचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीशी संलग्न असलेल्या २२ संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे प्रवासी संघटनने ईमेल मोहीम आखली आहे.
कोकणवासीयांनी आपल्या हक्कासाठी, सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी, भूमिपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, केवळ कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे, या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी ईमेल पाठवायचे आहेत. त्याकरिता लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर जाताच तो ईमेल रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी पाठविले जाणार आहेत.
हजारोंच्या संख्येने कोकणवासीयांनी तसेच त्यांच्या सार्वजनिक मंडळांनी, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी वैयक्तिकरीत्या ईमेल पाठवावेत अशी अपेक्षा आहे. ईमेल पाठविण्यासाठी लिंक अशी – https://konkan-railway-sanghatana.netlify.app/