रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील परटवणे परिसरातील फगरवठार येथे दरड कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. संजय कदम, त्यांची पत्नी सोनाली कदम (50) तसेच मुलगा पराग (28) व मुलगी जुई (23) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. रविवारी दिवसभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरातील फगरवठार येथे संजय कदम यांचे घर आहे. रविवारी रात्री कदम कुटुंब घरात असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कदम यांच्या घराशेजारी असलेली दरड कदम यांच्या घरावर कोसळली. यावेळी घरात असलेले संजय कदम त्यांची पत्नी व दोन मुल जखमी झाली. घरावर दरड कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी मदत कार्य करत जखमी चौघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सिव्हील येथे उपचार सुरू आहेत.