रत्नागिरी:-देवगडचे सुप्रसिद्ध गायक प्रसाद शेवडे आणि भाग्यश्री आठल्ये-जोशी यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम रत्नागिरीत येत्या बुधवारी (दि. १७ जुलै) आषाढी एकादशीनिमित्ताने रत्नागिरीत होणार आहे.
येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसुर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे हे सलग दहावे वर्ष आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत मंडळाच्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संकुलातील ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहात भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
गायक प्रसाद शेवडे आकाशवाणीचे बी हाय ग्रेडचे कलाकार असून, प्रख्यात गायक पं. प्रभाकर कारेकर आणि प्रख्यात हार्मोनियम वादक पं. राजाभाऊ विचारे यांच्याकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण मिळाले आहे. गायनाबरोबरच ते उत्तम ऑर्गन/हार्मोनियम वादक व तबलावादकही आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम गीत गायनातही त्यांचा हातखंडा आहे. भाग्यश्री आठल्ये-जोशी यांनी एमए संगीत ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम क्रमांकाने मिळविली आहे. प्रख्यात गायिका विदुषी मंजूषा पाटील आणि डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्याकडून त्यांना शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन मिळाले आहे.
अभंगवाणीला तबलासाथ निखिल रानडे, पखवाजसाथ गणेश रानडे, ऑर्गनसाथ संतोष आठवले, हार्मोनियमसाथ निरंजन गोडबोले, तालवाद्यसाथ प्रा. सुहास सोहोनी करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन वामन जोग करणार आहेत.
रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.