मंडणगड:- तालुक्याला अतिवृष्टीचा जबरदस्त तडाखा बसला असून तुळशी घाटात दरडी कोसळण्याचे सत्र थांबायचे काही नाव घेत नाही. त्यातच आता केळवत घाटातही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. भिंगळोली हद्दीत असलेल्या मंडणगड एस.टी. आगाराच्या समोरील मार्ग हा पुराच्या पाण्याने भरल्याने या मार्गावरील वाहतुकीसह तुळशी आणि केळवत घाटातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मंडणगड तालूक्यातील नागरिकांना याचा फटका तर बसलाच. शिवाय तालूक्याबाहेरून आलेल्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला.
मंडणगड तालुक्यात रविवारी 205 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यात म्हाप्रळ महसुल मंडळात म्हाप्रळ 94 मिलीमिटर, देव्हारे महसुल मंडळात 125 मिलीमीटर, वेसवी महसुल मंडळात 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी 133.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 14 जुलै 2024 अखेर तालुक्यात एकूण 1695.98 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.
मंडणगड बाणकोट मार्गावर तुळशी घाटात पडलेल्या दरडी साफ करुन प्रशासन उंसत घेत नाही, तोच पुन्हा शनिवारी रात्री तुळशी घाटात 3 ठिकाणी व केळवत घाटात एका ठिकाणी नव्याने दरडी कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा बंद पडली. तर मंडणगड शहरातील गांधी चौकात भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध आल्याने कोंझरकडे जाणारी वाहतुक बंद पडली होती. त्यात रविवारी सकाळी तुळशी आणि केळवत या दोन्ही घाटात पुन्हा तिस-यांदा दरडी कोसळल्याने मंडणगड केळवत पालघर कुंबळे मार्गे दापोली खेडकडे येणा-या वाहतुकीवर परिणाम झाला. तर तुळशी घाटात कोसळलेल्या दरडींच्या सत्रामुळे मंडणगड तालूक्यातील देव्हारे, आंबडवे, उमरोली, वेसवी, बाणकोट, वेळास, खार, साखरी, आंबवली, जावळे, चिचघर या गावांसह दापोली तालूक्यातील मांदिवली, केळशी, आडे, उटंबरकडे येणारी वाहतुक पुर्णपणे ठप्प पडली.
दापोलीहून मुंबई, पुणे, ठाणे, पनवेल, बोरीवली आदी शहराकडे जाणा-या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. तुळशी घाटातील दरडींचे सत्र हे राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या अर्धवट कामामुळे होत असून ढिम्म महामार्ग प्राधिकरण प्रशासन हे तुळशी घाटातील वाहतुक सुरळीतपणे सुरू राहण्याच्या दृष्टीने ठोस उपाय योजना करताना दिसत नाही त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत येथील दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच राहील अशी षक्यता आहे.