लांजा : दोन महिलांना चिरडून त्यातील एकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाला लांजा दिवाणी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ही अपघाताची घटना २३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.१५ वाजता मुंबई – गोवा महामार्गावरील आंजणारी घाटीत घडली होती.
तालुक्यातील आंजणारी पेंढारीवाडी येथील दोन्ही महिला नेहमीप्रमाणे सकाळी शेतीच्या कामासाठी मुंबई गोवा महामार्गावरून चालल्या होत्या. महामार्गावरून चालत जात असताना लखनऊ येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने या दोघींना जोरदार धडक दिली. एच. आर. ३८ व्ही – ८७९४ या क्रमांकाचा हा ट्रेलर सद्दाम हकीमुद्दिन अन्सारी (२६ वर्षे रा. तहसील वैनपुर जिल्हा कैमूर, राज्य बिहार) हा चालवत होता. या ट्रेलरने या दोघी पादचारी महिलांना जोरदार धडक दिल्यानंतर यातील पल्लवी प्रकाश पेंढारी (४७ वर्षे, रा. आंजणारी पेंढारीवाडी) या महिलेला अक्षरशः चिरडले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर जयश्री धोंडू पेंढारी (५५ वर्षे) ही महिला गंभीर जखमी झाली होती.
या अपघात प्रकरणी लांजा दिवाणी न्यायालयाने ट्रेलर चालक सद्दाम हकिमुद्दीन अन्सारी याला दोषी ठरवत त्याला शिक्षा ठोठावली आहे. यामध्ये भा. दं. वि. कलम ३०४ (अ) नुसार एक महिना सश्रम कारावास, २७९ नुसार १००० रूपयांचा दंड, ३३७ नुसार ५ दिवस सश्रम कारावास, ३३८ नुसार १० दिवस सश्रम कारावास व मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार १०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक दिवस साधा कारावास, दंड न भरल्यास 4 दिवस साधा कारावास, मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार १००० रुपयांचा दंड याप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. दिवाणी न्यायालय लांजाचे न्यायदंडाधिकारी (वर्ग-१) पी. आर. भोसले यांनी ही शिक्षा ठोठावली. याकामी सरकारी वकील म्हणून प्रतिभा पवार यांनी काम पाहिले. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रविण देशमुख यांनी याकामी तपास केला होता. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस हेड. कॉन्स्टे. उर्मिला शेडे यांनी काम पाहिले.