प्रवाशांना बसमध्ये चक्क छत्री उघडून, भिजत करावा लागतोय प्रवास
संगमेश्वर: पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटताच देवरुख आगाराच्या गळक्या गाड्या प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. संगमेश्वर ते कानरकोंड ते देवरुख सोडण्यात आलेल्या एस.टी बसच्या छतातुन जलधारा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. छतातून लागलेल्या जलधारा प्रवाशांच्या आसनावर पडू लागल्या. तसेच तुटलेल्या खिडक्या आणि छतातून जलधारा प्रवाशांच्या अंगावर पडू लागल्याने प्रवाशांना भिजत तसेच छत्र्या उघडून बसावे लागले. या जलधारा एकाच ठिकाणाहून नव्हे अनेक ठिकाणाहून लागल्या होत्या. या एस.टी बस मधून स्त्री,पुरुष प्रवाशांसह शालेय तसेच महाविध्यालयीन विद्यार्थी प्रवास करत होते. या सर्वानाच गैरसोयीच्या सामोरे जावे लागले.
महामंडळाकडून अनेक नवनव्या बस रस्त्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अनेक वेगवेळ्या बसेस रस्त्यावर आणल्या गेल्या आहेत त्या मध्ये हिरकणी, शिवशाही अशा वेगवेगळ्या आणि अद्यावत तंत्रज्ञान असलेल्या बस चा समावेश आहे. तर प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी नवनवे उपक्रमही महामंडळ कडून राबवले जात आहेत. महिलांना प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिल्या मुळे महामंडळाच्या तिजोरीतही नफा होत आहे. पण प्रवाशांच्या नशिबी अजूनही मोडक्या आणि गळक्या एस.टी बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशी वर्गातून नाराजीचे सूर उमटत आहेत.
नेहमी “प्रवाशांच्या सेवेसाठी”हे ब्रीद घेऊन मिरवणाऱ्या तसेच सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या गळक्या बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सीटही व्यवस्थित नसल्याने प्रवाशांचा प्रवास हा असुरक्षित होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.