रत्नागिरी:-समाज माध्यमांवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणीसंबंधी जाहिरात देवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. अभय कृष्णनाथ पंडित (52, रा.मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत दाखल केल़ी. गुंतवणूकीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आपली 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पंडित यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी समाज माध्यमावर शेअर मार्केटसंबंधी जाहिरात पाहिली होती. यामध्ये अपोलो कंपनीच्या नावाने असलेल्या या जाहिरातीमध्ये शेअर मार्केच्या माहितीसाठी व्हॉटसऍप ग्रुप जॉईन करा असे सांगण्यात आले होते. तक्रारदार यांनी हा गृपमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांना सांची अरोरा नावाच्या महिलेने फोन केला. तसेच आपण अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट कंपनीची ऍडव्हायझर असल्याची बतावणी केली.
संबंधित महिलेने तक्रारदार यांना कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचा मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखविले. या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी 29 फेब्रुवारी ते 13 मे 2024 या काळात 6 लाख रुपये महिलेने सांगितलेल्या खात्यावर जमा केली. गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले, त्यानुसार त्यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यापकरणी सांची अरोरा या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.