रत्नागिरी:-रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल होताच बरेच प्रवाशी प्रतीक्षा यादीवरील तिकिटावरच प्रवास करत होते. यापुढे हा प्रवास महागात पडणार आहे. प्रतीक्षा यादीवर प्रवास केल्यास दंड भरावा लागणार आहे. केवळ दंड भरून प्रवाशांची अजिबात सुटका होणार नसून त्यांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभाही दिली जाणार नाही. एवढच नव्हे तर तिकीट तपासणीसानी दंड वसूल केल्यानंतर ‘वेटींग’वर असलेल्या प्रवाशांना कोणत्याही स्थानकात डब्यातून खाली उतरवण्यात येणार आहे. या नियमांची प्रत्यक्षात अंमलबजावणीदेखील होणार आहे.
प्रतीक्षा यादीवरील तिकिटावर प्रवास करत कोकणवासीय गाव गाठत असतात. बऱ्याचदा प्रवास करताना तिकीट ‘कन्फर्म’ होत नाही. ऑनलाईन केलेले तिकीट प्रतीक्षा यादीवर असल्यास आपसुकच रद्द होते. मात्र काऊंटरवर काढलेले तिकीट रद्द होत नाही. यातील अनेकजण वेटींग तिकिटावरच रेल्वेतून प्रवास करणे पसंत करतात. मात्र हा प्रवास साऱ्यांना महागात पडणार आहे. वेटींग तिकिटावर रेल्वे प्रवास केल्यास 440 रूपये इतका दंड भरावा लागणार आहे. तसेच रेल्वे डब्यातून तिकीट तपासणीस कोणत्याही स्थानकात उतरवणार असल्याने प्रवाशांची कोंडी होणार आहे.
1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या नियमी काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाल्याने त्या परिणाम ‘वेटींग’ तिकिटावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर होणार आहे. केवळ दंड भरून यातून कोणीही सुटका होणार नाही. प्रवाशांना जनरल कोचमध्ये पाठवण्याचा अधिकारही तिकीट तपासणीसांकडे दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या निर्णयाचा गणेशोत्सव कालावधीत गणेशभक्तांना मोठा फटका बसणार आहे.