रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी येथे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशाल बलवंत घोरपडे (32, रा. मिरज खटाव, जि. सांगली), संकेत शिवाजी चव्हाण (फणसोप), सुरज राजु साळुंखे (पुणे) अशी संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून कारसह 15 लाख 20 हजार 116 रुपयांचा गुटखा जप्त केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुटख्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. 11 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सांगलीहून गणपतीपुळेकडे जाणाऱ्या कारची (क्र. एमएच ऐपी 4545) तपासणी केली. वाहनामध्ये गुटखा, विमल पानमसाला, मिराज तंबाखू, सुगंधी तंबाखू, आरएमडी पानमसाला असा सुमारे 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. वाहनासह पोलिसांनी 15 लाख 20 हजार 116 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.