रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरट्याने लांबवल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. तुषार ईश्वर चंदनशिवे (23, रा.थिबा पॅलेस रोड रत्नागिरी) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार चंदनशिवे हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती नियंत्रण कक्षात काम करतात. 10 जुलै 2024 रोजी ते रात्री या कक्षामध्ये आपल्या ड्युटीसाठी आले होते. रात्री 3 ते 5 च्या कालावधीत चोरट्याने कक्षामध्ये प्रवेश करून चंदनशिवे यांचा मोबाईल चोरुन नेला, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केला.