महाड:-रायगड जिल्ह्यातील भोर-महाड-वरंधा घाटातील खालेला रस्त्यासह कोसळणाऱ्या दरडीचा संभाव्य धोका लक्षात घेवून 31 ऑगस्टपर्यंत वरांधा घाटातील रस्ता वाहतुकीस बंद करण्याच्या प्रस्तावाला अखेर रायगड जिल्हाधिकाऱ्यानी हिरवा कंदील दाखवला आहे. 31 ऑगस्टपर्यंत घाटातून सर्वच वाहनांना वाहतुकीस अटकाव करण्यात आला आहे. पोलादपूर, कराड, कोल्हापूर मार्गाचा अवलंब करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, वाहतुकीस मज्जाव करण्यात आलेला असतानाही घाटातून धोकादायक वाहतूक सुरु आहे.
वरंधा घाटाच्या दुरूस्तीसाठी मे महिन्यात एक महिन्याचा ‘मेगाब्लॉक’ घेवून देवून दरडी कोसळण्यासह रस्ता खचण्याचे प्रकार सुरूच आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ता दिवसागणिक खचत चालल्याने वाहनालकांचा जीव टांगणीवर होता. घाटातील धोकादायक मार्गावरून वाहतुकीस बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव पेणच्या राष्ट्रीय महामार्ग विभाग व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला होता.
त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत घाटातून सर्वा वाहनांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश धुडकावत वरंधा घाटातून सर्रासपणे धोकादायक वाहतूक सुरूच आहे. प्रशासन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रघुवीर घाटातून वाहतूक सुरू असतानाही त्यांच्यावर कुठली कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे वरंधा घाटातून वाहतूक बंदचा फतवा केवळ नावापुरता राहिल्याचे बोलले जात आहे. खचलेल्या वरंधा घाटातून सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा पश्नही उपस्थित केला जात आहे.