रायगड:-महाडकरांसाठी सोमवार हा दिवस दहशत निर्माण करणारा म्हणून आठवणीत राहणार आहे, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक रेडा रहदरीच्या रस्त्यावरून बेभान पणे सैरावैरा धावत अनेक वाहनांवर, वाहन चालकांवर, पादचाऱ्यांवर जीव घेणे हल्ले करत होता. उधळलेल्या रेड्याने सुमारे सात ते आठ जणांना जखमी केले ,त्यातील तिघेजण गंभीर झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रेड्याला पकडण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करीत होते. परंतु बेभान सुटलेला रेडा नियंत्रणात येणे शक्य नव्हते. तासाच्या अथक प्रयत्नातून अखेर शहराजवळ असलेल्या चांभार खिंड वसाहतीमध्ये या रेड्याला जेरबंद करण्यात यश आले.
सोमवारी (दि.८ जुलै) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जनकल्याण रक्तपेढी इमारतीच्या बाजूने एक उधळलेल्या रेडा रहदारीच्या रस्त्यावर आला, आणि सर्वप्रथम मोटार सायकल स्वारा वर जीव घेणा हल्ला केला, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. नंतर नजीकच्या रावसाहेब भिलारे मैदानामध्ये असलेल्या कारला त्याने जोराने धडक दिली. त्यानंतर रेड्याने आपला मोर्चा काकरतळे परिसरातील मोहल्यातून एसटी बस स्थानका कडे वळवला, एसटी बस स्थानकामध्ये रेड्याने प्रवेश केला. त्या ठिकाणी एक तरुणी व एका प्रवाशावर हल्ला करून त्यांना जखमी केले. उधळलेला रेडा महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सैरावैरा धावत असताना त्याने अनेकांवर हल्ले केले. तब्बल पाच ते सहा तास या रेड्याने संपूर्ण महाड शहरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती.
रेडा चांभार खिंड वसाहती मध्ये आल्यानंतर सुमारे २५ ते ३० तरुणांनी या रेड्याला पकडण्यामध्ये यश मिळवले. रेड्याने केलेल्या हल्ल्यामध्ये नितेश राठोड (४५) राहणार जिते, ता. महाड ,भाऊ चव्हाण (६५) रा. शिवाजी चौक, महाड व आरती सुधीर जाधव (२३) राहणार गांधार पाले, तालुका महाड हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत असून अन्य जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
महाड नगरपालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, सोमवारी घडलेल्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. सैरावैरा व मोकाट जनावरांमुळे जीवित हानी देखील होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. महाड शहरांमध्ये फिरत असलेली मोकाट जनावरे ही गंभीर समस्या आहे ,पालिका प्रशासनाकडून जनावरांचा बंदोबस्त करण्यात दुर्लक्ष केले जात आहे . प्रमुख रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असताना सातत्याने दिसून येतात. गेल्या काही दिवसापासून या मोकाट जनावरांमध्ये गाढवांची देखील भर पडली आहे, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिला ,लहान मुले, वृद्ध नागरिक यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते.
मात्र पालिका प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाच्या कारभारा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उधळलेल्या रेड्याच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी महाड शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.