नवी दिल्ली:-जम्मूच्या कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मछेडी परिसरात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकून गोळीबार केला. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले होते, त्यातील चार जवानांना वीरमरण आले असून, इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन जात होते, यावेळी अचानक टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला या घटनेत दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, पण आता यात चार जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
राजौरी येथील लष्कराच्या तळावर हल्ला
रविवारी राजौरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. रात्रीच्या अंधारात लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यावेळी सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या जवानानेही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या घटनेत जवान जखमी झाला, तर अंधाराचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले.