पत्रकार संतोष पवार यांच्या काव्यरचनेने जाधव सरांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत!
गणपतीपुळे/वैभव पवार:-आशिया आंतरराष्ट्रीय कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने (IAO-USA) माध्यमिक विद्यालय वरवडे ,भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नामांकित क्रीडाशिक्षक राजेश महादेव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. हा बहुमान त्यांना क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राप्त झाल्याने डॉ.राजेश जाधव सरांचा रविवारी ७ जुलै रोजी सायंकाळी वाटद खंडाळा येथे मित्रपरिवार व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी खंडाळा येथील मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉक्टर राजेश जाधव सरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या ग्रुपच्या वतीने डॉक्टर राजेश जाधव सरांचा विशेष सन्मान त्यांच्या सुविद्य पत्नी ऋतुजा जाधव यांचे समवेत करण्यात आला. याप्रसंगी रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुका संघटक नंदकुमार यादव,, बौद्धाचार्य राजकुमार जाधव, रविकांत पवार, पत्रकार संतोष पवार किशोर पवार ,संदीप पवार , बौद्धचार्य संदीप जाधव, डॉक्टर मयुरेश मोहिते, डॉक्टर विकी सावंत, नितीन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या वतीने डॉक्टर राजेश जाधव सरांना दैदिप्यमान वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आला तसेच त्यांच्या उत्तुंग आणि उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढण्यात आले. यावेळी डॉक्टर राजेश जाधव सरांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कळझोंडी येथील पत्रकार संतोष पवार सर यांनी स्वरचित केलेले काव्य सादरीकरण उपस्थित सर्वच मान्यवरांना भारावून टाकणारे ठरले.
तसेच डॉक्टर राजेश जाधव सरांना ही संतोष पवार सरांनी स्वरचित केलेले काव्य नवी संजीवनी देणारे ठरले. यानंतर शुभेच्छापर कार्यक्रमात रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी डॉ. राजेश जाधव सरांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाचे कौतुक करून डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा बहुमान समाजासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद बाब ठरल्याचे सांगितले.त्यानंतर रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित तालुका संघटक नंदकुमार यादव सरांनी आपल्या मनोगतून डॉ. राजेश जाधव सरांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून विशेष कौतुक केले. यानंतर सत्कारमूर्ती डॉ. राजेश जाधव सर यांनी आपल्या सत्काराबद्दल ऋण व्यक्त करताना सांगितले की, आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा कायम पणे पाठीशी असल्यामुळेच एवढा मोठा बहुमान मिळवणे शक्य झाले. त्यामुळे अशाच स्वरूपात आपण सर्वजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून मला नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देत रहावे,अशी सदिच्छा व्यक्त केली.राजेश जाधव सरांचा पदवीदान समारंभ तामिळनाडू राज्यातील होसूर शहरात संपन्न झाला.
उपक्रमशील शिक्षक म्हणून काम करणाऱ्या राजेश जाधव सरांना याआधी झी २४ तास वाहिनीचा सन २०१३ साली अनन्य सन्मान अवॉर्ड , सन २०२२ साली दैनिक सकाळचा आयडॉल ऑफ महाराष्ट्र राज्य अवॉर्ड, तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार , क्रीडा व युवक सेवा संचालनालय राज्य पुणे येथील रत्नागिरी जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,भारत सरकार अंतर्गत रत्नागिरी जिल्हा नेहरू युवा पुरस्कार ,मालगुंड एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी संस्थेचा कै. सदानंद परकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे रत्नागिरी संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, संवेदना सेवाभावी संस्थेमार्फत राज्यस्तरीय संवेदना पुरस्कार ,स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार , हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचा रत्नागिरी जिल्हा गुणी शिक्षक पुरस्कार ,आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रेस क्लब लांजा येथील कै.ग. रा. तथा भाई नारकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार , ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक असे प्रतिष्ठेचे प्रेरणादायी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
राजेश जाधव सर हे गेली ३४ वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अध्यापनाबरोबरच राजेश जाधव हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडत असतात.शैक्षणिक, सामाजिक आणि विधायक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान आहे.राजेश जाधव यांचे अनेक खेळाडू विद्यार्थी विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. एक समाजप्रिय, कर्तव्यतत्पर आणि सेवाभावी शिक्षक म्हणून राजेश जाधव सर यांच्याकडे पाहिले जाते. अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रसंगात अनेकांना आधार देण्याचा त्यांचा गुण वाखाणण्याजोगा आहे. सरांच्या यशात त्यांची सुविद्य पत्नी सौ.ऋतुजा जाधव यांची मोलाची साथ लाभली आहे.त्यांची मोठी मुलगी वैद्यकीय MBBS चे शिक्षण घेत आहे,तर मुलगा महाविद्यालयातील शिक्षण घेत आहे.आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत सरांना त्यांच्या आई -वडीलांची प्रेरणा खूपच मोलाची ठरली.आपल्या आई-वडिलांनी संसारासाठी केलेल्या अपार कष्टांची जाणीव ठेवून राजेश जाधव सर यांनी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यात ते यशस्वी होत गेले,यामागे त्यांची जिद्द आणि चिकाटी आणि इच्छाशक्ती प्रबळ ठरली.
आपल्या कर्तबगारीने डॉक्टरेट संपादन केलेले राजेश जाधव यांच्या देदिप्यमान वाटचालीबद्दल आणि बहुमानाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.