चिपळूण:-गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरजोळी ते उक्ताड परिसरातील खड्ड्यांनी अक्षरश: वाहनधारकांच्या नाकीदम आणला आहे. चार दिवसांपूर्वी राजकीय नेतेमंडळीने मोठा गाजावाजा करून महामार्ग उपविभागाला खड्डे भरण्यास लावले होते. हे खड्डे चार दिवसांत पुन्हा उखडले आहेत. या खड्ड्यात वारंवार होणारे अपघात, अंगावर उडणारे चिखलयुक्त पाणी यामुळे स्थानिकांसह वाहनचालकही पुरते हैराण झाले आहेत.
‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता’ असा प्रश्न मिरजोळी व उक्ताड परिसरातील रस्ता पाहून सर्वसामान्यांना पडला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा या रस्त्याला आहे. तरीही एवढी बिकट अवस्था अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या ठिकाणच्या खड्ड्यात एखादा मोठा अपघात होण्याची वाट तर अधिकारी वर्ग पहात नाही ना, अशी शंका सुध्दा आल्या शिवाय रहात नाही. या मार्गावरून सायकल, दुचाकीवरून विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात.
वयोवृध्द, महिला, दिव्यांग बांधव-भगिनी सुध्दा प्रवास करतात. शहराच्या प्रवेश द्वारावरच या रस्त्याची एवढी भयावह अवस्था झालेली असतानाही अधिकारी वर्ग मात्र सोयीस्कर कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवताच येथे दगड, खडी, माती टाकून खड्डे भरले जातात. दोन ते तीन दिवसांपूर्वीही उक्ताड परिसरात तशाच प्रकारची वरवरची मलमपट्टी केली गेली. मात्र ती उपाययोजना तकलादू ठरली आहे. पावसात तेथील खड्डे पुन्हा उखडले आहेत. तर मिरजोळी-साखरवाडीतील खड्डे जैसे थे असल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत.