लांजा : माचाळ हे थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटकांचा ओढा या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या ठिकाणी येणाऱ्या काही पर्यटकांनी येथे स्थानिकांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिकांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे बोलले जात आहे.
येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या स्थानिक महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे, असे बतावणी करून पैसे उकळणाऱ्या पर्यटकांना येथील ग्रामस्थांनी चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. शुक्रवारी तीन पर्यटक माचाळ ठिकाणी आले होते. त्यांनी एका महिलेकडे जेवणाची ऑर्डर दिली. दुपारी मौजमस्ती झाल्यानंतर जेवण झाले. जेवणाचे बिल मागितले असता या पर्यटकांनी बिल देण्यास नकार दिला.
या पर्यटकांनी तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे. तुम्ही दुसऱ्याकडून वीज घेतली आहे, असे सांगून तुम्हाला वीस हजार रुपये दंड होईल, असे सांगितले. इतक्यावरच न थांबता उलट या महिलेकडून दोन हजार रुपये घेतले. दरम्यान, महिलेला फसवल्याची माहिती माचाळ गावातील ग्रामस्थांना समजली. तातडीने ग्रामस्थ जमा झाले. चार चाकी वाहन घेऊन आलेल्या या तिघांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतले आणि फसवणुकीचा जाब विचारला. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. येथील ग्रामस्थांनी माचाळ येथे येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या ओळखीचा पुरावा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.