चिपळूण : चिपळूण उड्डाण पुलाबाबत दुसरी दुर्घटना समोर आली आहे. चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या पिलरवरून चार कामगार कोसळून जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षांपासून मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीककरणाचे काम सुरू आहे. यामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पेढे- परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटर दरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे.
साधारणपणे या पुलाची लांबी १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. या पुलासाठी एकूण ४६ पिलर उभारण्यात आले असून दरम्यान बहादूरशेखनाका येथे १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाच्या गर्डरसह क्रेन कोसळण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शुक्रवार ५ जुलै रोजी पुन्हा दुर्घटना घडली आहे. उड्डाणपुलाच्या पिलरचा भाग तोडत असताना भल्या मोठ्या क्रेनचा दोरखंड अचानक तुटल्यामुळे ४ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चिपळुणात खळबळ उडाली आहे. जखमिंची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.