रत्नागिरी:-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत जन्मदाखला उपलब्ध नसल्यास आधारकार्डावरील जन्मतारीख ग्राह्य धरून सर्वसामान्य महिलांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केली आहे
राज्य शासनाने लाडकी बहिण ही योजना जाहीर केल्यानंतर असंख्य महिला-भगिनी जन्मदाखला मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यातील ५० वर्षांवरील महिलांकडे जन्मदाखला असणे कठीण आहे. तसेच इतर महिलांनाही शालेय दाखल्यावरील जन्मतारीख गृहीत धरल्यास वेगळा जन्मदाखला काढण्याची आवश्यकता नाही. महिलावर्गाचा त्रासही त्यामुळे कमी होईल. आधारकार्डवर जन्मतारखेची नोंद असते. ती नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरावी आणि त्या महिला लाभार्थीला योजनेचा फायदा द्यावा. जन्मदाखल्याअभावी महिला त्या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने आधारकार्डवरील नोंदीला मंजुरी देऊन योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी साळवी यांनी केली आहे.