जिल्हा सहआयुक्तांनी घेतली इनायत मुकादम यांच्या तक्रारीची दखल
चिपळूण: येथील नगर पालिका हद्दीत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती भिंतीवर दगडी आच्छादनाचे काम बोगस अंदाजपत्रकाद्वारे सुरू असून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
या तक्रारीची जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरात सुरू असलेल्या शिव पुतळा परिसर सुशोभिकरण कामाची चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.नगर पालिकेमार्फत शहरात अनंत आईस फॅक्टरी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व परिसर सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. पुतळ्याच्या चौथरा तसेच मागील भिंतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर परिसर सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या कामाचे सुरुवातीचे अंदाजपत्रक ८८ लाख इतके होते. दरम्यान, चिपळूणमध्ये महापूर आला आणि त्यामध्ये अंदाजपत्राची संचिका गहाळ झाली. त्यामुळे नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले. मात्र, नवीन अंदाजपत्रक १ कोटी ३५ लाख इतक्या खर्चाचे तयार करण्यात आले अ असून ते चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आले आहे. असा इनायत मुकादम यांचा आरोप आहे.
मुकादम यांनी आपल्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. सुशोभिकरणच्या भिंतीसाठी जो दगड वापरण्यात आला आहे, तो अत्यंत कमी दर्जाचा असून अंदाजपत्रकात समाविष्ट असलेला दगड आणि वापरण्यात येणारा दगड यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. प्रत्यक्षात अंदाजपत्रकात नमूद असलेला मूळ दगड हा सॅम्पल म्हणून नगर पालिकेत ठेवणे गरजेचे होते. मात्र तसेही करण्यात आलेले नाही. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रक ज्या दरपत्रकाच्या आधारे तयार करण्यात आले ते दरपत्रकच बोगस असल्याचा गंभीर आरोप मुकादम यांनी तक्रारीत केला आहे. श्री. मुकादम यांनी यासंदर्भातील तक्रार ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल केली होती. या तक्रारीची जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी दखल घेतली असून चिपळूण नगर पालिकेला स्पष्ट पत्र दिले आहे. या कामाची सखोल चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करावा असे आदेशही देण्यात आले आहे. सद्यस्थितीत काम बंद असून ठेकेदाराचे बील देखिल थांबवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चौकशी झाल्यास सत्य काय हे समोर येणार आहे.
शिवप्रेमींच्या अस्मितेला ठेच पोचविण्याचा प्रकार चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा डौलाने उभा रहावा, यासाठी हजारो शिवप्रेमीनी प्रयत्न केलेले आहेत. शिवप्रेमींच्या अस्मितेचा व तमाम नागरिकांच्या भावनेचा हा विषय आहे. मात्र अशा प्रकारे लाखों रुपये खर्च करून दर्जाहीन काम होत असेल तर आम्हा शिवप्रेमींच्या अस्मितेला ठेच पोहोचविण्याचा प्रकार आहे. तो कदापिही सहन केला जाणार नाही. -इनायत मुकादम, माजी नगरसेवक, चिपळूण