कोकणातील अन्य जागांबाबतही चाचपणी करून निर्णय घेणार
गुहागर : गुहागर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असून गुहागर विधानसभेसाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी यांच्या नावाची पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
गुहागर तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा हॉटेल शांताई येथे संपन्न झाला. या मेळाव्यानंतर सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पत्रकाराची संवाद साधला.गुहागर, चिपळूण, खेड येथील पदाधिकाऱ्यांनी प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महाराष्ट्र मध्ये सातत्याने वाटचाल करणारा पक्ष आहे. गुहागर विधानसभेमध्ये चार ते पाच वर्ष प्रमोद गांधी यांच्यासारखा तरुण सातत्याने पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली आहे. राज साहेब कार्यकर्त्यांच्या मागणीचा जरूर विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदीजी पंतप्रधान व्हावेत म्हणून राज साहेबांनी लोकसभेला दिलेला हा पाठिंबा होता. मात्र, आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र लढणार असल्याचे राज साहेब यांनी राज्याच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती खेडेकर यांनी दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र मध्ये २०० ते २२५ एवढ्या जागा लढणार असून त्याची व्युहरचना तयार झाली आहे. कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्मण सेना दापोली विधानसभा, गुहागर विधानसभा, संगमेश्वर विधानसभा, राजापूर विधानसभा, तसेच सिंधुदुर्गमध्ये दोन विधानसभा, रायगडमध्ये महाड, श्रीवर्धन या ठिकाणी निवडणूक निवडणुकीची चाचपणी करून आपले उमेदवार उभे करणार आहे आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नसतील त्या ठिकाणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असेही खेडेकर यांनी पत्रकार परिषद सांगितले.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकणचे सरचिटणीस वैभव खेडेकर, गुहागर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, जिल्हा सचिव संतोष नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.