रत्नागिरी:-कुवारबाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने या परिसरात उघड्यावर कचरा टाकून रहिवाशांच्या जीविताशी खेळले जात आहे.त्यामुळे कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्थानिक रहिवाशांना घेऊन येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
कुवारबाव ग्रामपंचायतीने २५ मार्च २०२३ रोजी घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मागील ८७ गुंठे शासकीय जमिनीपैकी काही जागा मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र पाठवून जागा मंजुरीचे निर्देश दिले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून गेले १५ महिने त्यावर निर्णय दिला जात नाही. उलट महसूल विभागाकडून ११ जून २०२४ रोजी रत्नागिरीच्या तहसीलदारांना पत्र पाठवून तांत्रिक बाबी उपस्थित करून कागदी घोडे नाचविले जात आहेत. तहसीलदारांकडून या पत्राद्वारे अभिप्राय मागविण्यात आला आहे. महसूल खात्यामार्फत हा प्रकल्प होण्यात दिरंगाई केली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.जागा नाही म्हणून प्रकल्प नाही आणि प्रकल्प नाही म्हणून घंटागाडी नाही, घंटागाडी नाही म्हणून कचरा उचलला जात नाही आणि कचरा उचलला जात नाही म्हणून रहिवासी आणि व्यापारी दुकानदार सर्व कचरा रस्त्याच्या बाजूला आणून कचऱ्याचे ढीग निर्माण करीत आहेत.
त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन मोकाट कुत्री आणि मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आणि रत्नागिरी शहराचे उपनगर बनलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या परिसरातील रहिवासी त्यामुळे हैराण झाले आहेत. अखेरचा उपाय म्हणून उपोषणाचा निर्णय ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे.पालकमंत्री नामदार श्री. सामंत यांनी निर्णय वेगवान शासन गतिमान या विद्यमान शासनाच्या प्रतिमेला हरताळ फासणाऱ्या महसूल विभागाला याचा जाब विचारावा, अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे.