राजापूर:राजापूर शहरात फिरणाऱ्या त्या तीन अनोळखी मनोरूग्णांना रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्यातून राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमिर खलिफे यांनी उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा मनोरूग्णालयात दाखल करत पुन्हा एकदा माणसुकीचे दर्शन घडविले आहे. यासाठी राजापूर न. प. व पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.या तिन्ही मनोरूग्णांना राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने ताब्यात घेत, त्यांची शारिरीक स्वच्छता करून व जिल्हा शासकिय रूग्णालयात वैद्यकिय तपासणी करून त्यांना मानसिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्या उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ॲड. खलिफे यांनी यासाठी पुढाकार घेत हे काम केल्याने त्यांचे शहरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.राजापूर शहरात गेले काही दिवस तीन अनोळखी मनोरूग्ण फिरत होते, शहर बाजारपेठ परिसरासह सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या या मनोरूग्णांच्या उपद्रवामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे या मनोरूग्णांबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी होत होती.याबाबत ॲड. खलिफे यांनी तातडीने दखल घेतली व रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधला. यासाठी राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी देखील मोलाचे असे सहकार्य केले.रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश सावंत, संतोष सावंत, छोटू खामकर व सहकाऱ्यांनी राजापूरात येत या तिन्ही मनोरूग्णांना पोलीस व नगर परिषदेच्या सहकार्याने ताब्यात घेत, त्यांची शारिरीक स्वच्छता करून त्यांना नवीन कपडे घालुन त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात वैदयकिय तपासणीसाठी नेले.
तेथे त्यांची वैद्यकिय तपासणी करून त्यांच्यावर मनोरूग्णालयात उपचार होऊन ते चांगले बरे व्हावेत यासाठी त्यांना जिल्हा मनोरूग्णालयात दाखल केले आहे.माजी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांसह राजरत्न प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पोलीस व नगर परिषद प्रशासनाने या मनोरूग्णांना उपचारासाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. ॲड. खलिफे यांनी यापुर्वीही राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अशा प्रकारे शहरात फिरणाऱ्या शहरातील तसेच अनोळखी अनेक मनोरूग्णांना अशा प्रकारे उपचारांसाठी दाखल केलेले आहे. ॲड . खलिफे यांनी राजरत्न प्रतिष्ठानच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविताना या प्रतिष्ठानचे अधिकृत सदस्यत्वही स्विकारले आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.