रायगड /प्रतिनिधी:-मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उरण ते लोटे असा नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर ट्रक खचलेल्या रस्त्यावरून घाट रस्ता चढत असताना वाहनाने पिकप न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळला, या अपघातात चालक गंभीर झाला असून हा अपघात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चालक अफिझुर रेहमान (५५) हा आयशर ट्रक क्रमांक एम एच ०५ ए एम २८१४ यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव (ता. पोलादपूर, जि. रायगड ) गावच्या हद्दीत आला असता, त्या ठिकाणी रस्ता खचलेला असल्यामुळे गाडीने पिकप घेतला नाही, ट्रक मागे आल्याने बॅरिकेड्स तोडून सुमारे ७० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक अफिझुर रेहमान वय ५५ वर्षे हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण धडे, उपनिरीक्षक समेळ सुर्वे, पोलिस हवालदार चिकणे, रामागडे, माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल जाधव,सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलिस हवालदार रविंद्र सरणेकर, पोलिस हवालदार घुले, ट्रॅफिक हवालदार धायगुडे, श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उतेकर ,१०८ रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड एमआयडीसी येथील अग्निशामक यंत्रणेला कशेडी व पोलादपूर पोलिसांनी पाचारण केले. येथील तीन अग्निशामक पथके घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग पोलिसांकडून दोन्ही बाजूची जाणारी येणारी वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे.