रत्नागिरी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ या महत्वाकांक्षी योजनेसाठी सर्वांनी पारदर्शकपणे काम करावे. लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा. तालुकानिहाय, गावनिहाय शिबीर आयोजित करुन, शिबीरामध्येच योजना मार्गी लावा. जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार महिलांना लाभ देवून राज्यात आदर्श निर्माण करा. जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर ठेवा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.
पालकमंत्री सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी आदींसह प्रांताधिकारी, तहसिलदार सहभागी झाले होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, या योजनेच्या संदर्भात राज्यामध्ये तीन तलाठी ट्रॅप झाले आहेत. त्यामुळे एकही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही याबाबत सर्वांना सूचना द्यावी. कोणी सापडलाच तर त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करु. गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. मंडप आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.
जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. तलाठी, सर्कल, तहसिलदार या सर्वांनीच या योजनेला प्राधान्य देवून पारदर्शक काम करावे. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी याबाबत नियोजन आणि सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, प्रातांधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
