लवकरच खड्डेही बुजवणार
चिपळूण: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरजोळी ते उक्ताड परिसरातील वादग्रस्त ठरलेली मोरी व गटार अखेर गुरूवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोकळे केले. बुजलेली मोरी व गटारं पुन्हा कार्यान्वित झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणावर वाहत येणाऱ्या पाण्याचा आता योग्य निचरा होणार आहे. यामुळे रस्त्यावर येणारे पाणी थांबणार असून नागरिकांना होणार त्रासदेखिल कमी होणार आहे.मिरजोळी ते उक्ताड रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांनी डोके वर काढले आहे.
पावसात तर या मार्गावरून नदी वाहत आहे. डोंगर भागातून वाहत येणारे पाणी पुढे सरकण्यासाठी येथे व्यवस्था नाही. गटारे, नाले, मोरी बुजली आहेत. बुधवारी कोसळलेल्या पावसात तर उक्ताड परिसरात महापूर आल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. अगोदरच रस्त्यावर खड्डे त्यात गुडघाभर पाण्यातून वाहनधारक व नागरिकांना प्रवास करावा लागला. यादरम्यान काही महिला, दुचाकीस्वार तेथे पडल्याच्या घटना घडल्या. हे दृश्य पाहिल्यानंतर मिरजोळी गावचे उपसरपंच विनोद पवार यांनी आमदार शेखर निकम यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत येथील रस्त्याच्या दुरवस्थेची माहिती दिली. आ. निकम यांनीही तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना मिरजोळी-उक्ताड परिसरात तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.
सरपंच कासम दलवाई यांनीही यासंदर्भात अधिकाऱ्यांना कल्पना देऊन रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली होती. तर कोंढे पंचक्रोशीतील शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख फैयाज शिरळकर, अशोक नलावडे, शशिकांत साळवी यांनीही रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर येणारे पाणी याविषयी संताप व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग विभागावर धडक देण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन गुरूवारी अधिकाऱ्यांनी उक्ताड परिसरात बुजलेली वादग्रस्त मोरी व गटार जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करून मोकळी केली, तर पाऊस कमी होताच तेथील खड्डे देखिल बुजविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी सरपंच कासम दलवाई, उपसरपंच विनोद पवार, माजी उपसरपंच गणेश निवाते यांना दिले. आ. शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांना सूचना करून येथील समस्येवर तातडीने मार्ग काढल्याने विनोद पवार यांनी त्यांचे आभार मानले.