चिपळूण : महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय चिपळूण व देवळेकर महा-ई-सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये नुकतेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.ग्रामीण भागातील पालकांना विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले विद्यालयातच प्राप्त व्हावेत व पालकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने या शिबिराचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आलेले होते.
या शिबिराला सावर्डे मंडळ अधिकारी अनिल जाधव, सावर्डे सजा तलाठी विजय पवार, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्यद्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,महा-ई-सेवा केंद्र संचालक विनोद देवळेकर, सहाय्यक गणेश पाटोळे,पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला मंडळ अधिकारी अनिल जाधव यांनी शासनाच्या या योजनेची माहिती उपस्थित सर्व पालकांना करून दिली व जास्तीत जास्त पालकांनी या शिबिराचा लाभ घेऊन विद्यालयातच दाखले प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन केले याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी ग्रामीण भागातील पालकांची सोय करून शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले व पालकांनी याचा फायदा घेऊन धावपळ टाळावी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेसाठी आवश्यक असणाऱ्या दाखले विद्यालयात प्राप्त करावेत विद्यालय नेहमीच पालकांना सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. या शिबिराला सावर्डे परिसरातील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व शासनाच्या या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.