माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची टीका
रत्नागिरी:- पावसाळ्याच्या सुरूवातीलाच शहरातील रस्ते खराब झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सध्याच्या नगर परिषदेची अवस्था म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी आहे. पुढील 15 दिवसांत शहरातील रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिला. शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मिलिंद कीर बोलत होते. शहरातील मारुती मंदिर ते माळनाका, मारुती मंदिर सर्कल, आठवडा बाजार, रहाटाघर एसटी स्टँड याठिकाणचे रस्ते खड्डे पडल्याने अत्यंत खराब झाले आहेत़ तसेच शहरात सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे येण्या-जाण्याचा मार्ग वरखाली झाला आहे. याचा नाहक त्रास व्यापारी व नागरीकांना होत आहे. रत्नागिरी शहराची भुयारी गटार योजना 2021 मध्ये मंजूर करण्यात आली. शहरात 135 लिटर पाणी प्रतिदिन देण्याची पालिकेची योग्यता झाल्यानंतर भुयारी गटार योजनेला मान्यता मिळते. भुयारी गटार योजना ही नळपाणी योजनेवर अवलंबून असते. म्हणून भुयारी गटाराचे काम प्राधान्याने घेणे आवश्यक होते. मात्र त्यापूर्वी रस्ता काँक्रीटीकरण करण्याचा घाट घातला गेला. असा आरोप कीर यांनी यावेळी केला.
सुमारे 100 कोटी रूपयांची नळपाणी योजना ही राज्यस्तरीय सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर झाली आहे. 15 कोटी रुपये नगरपरिषदेचे भाग भांडवल व राज्य शासनाचे सुमारे 85 कोटी रुपये. सदर 15 कोटी रुपये हे नगरपरिषदेने कर्ज घेतले आहे. नगरपरिषद आधीच देणेकरी असताना रिटायर्ड कर्मचा-यांची देणी देण्याचे असताना सुद्धा नगरपरिषदेला कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम करण्यात आले आहे असे मिलिंद कीर यांनी सांगितले.