भर पावसात प्रवाशांची व नागरिकांचे होतेय गैरसोय
चिपळूण/प्रतिनिधी: शहरातील बहादुरशेख नाका येथे मुंबई-गोवा व चिपळूण-कराड मार्गावर मार्गनिवाराशेड नसल्याने येथे भर पावसात प्रवाशांची गैरसोय होत आहे. कराड रोडवर पूर्वी असलेली तात्पुरती मार्गनिवारा शेड नगरपरिषदेने काढून टाकल्यानंतर येथे दोन लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. परंतु मार्गनिवारा शेडचे काम न झाल्याने आता प्रवाशांना पावसात भिजावे लागत आहे, तरी येथे तातडीने मार्गनिवारा शेड उभी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी केली आहे.
बहादूरशेख नाका येथे महामार्गाच्या काँक्रिटीकरण कामाच्यावेळी येथील सर्व झाडे व बांधकामे हटविल्याने तेथे उन्हाळ्यात उभे रहायलाही जागा नव्हती. काही प्रवाशांना चक्कर आल्याच्या घटनाही घडल्या होत्या. उन्हाळा संपला आणि सध्या पावसाळा सुरु झाला आहे. ऐन पावसात येथे पश्चिम महाराष्ट्रात जाणारे व्यापारी, विद्यार्थी व प्रवासी नागरिक वाहनांची वाट पहात उभे असतात. पावसामुळे येथे प्रवासी भिजतात. अनेकदा त्यांची गैरसोय होते. तरी येथे निवाराशेड उभारुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी अशोक पवार यांनी केली आहे.