दापोली:-आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीए मान्यवरांच्या सन्मानार्थ रविवार ३० जून २०२४ रोजी सायकल फेरी काढण्यात आली आणि दापोलीतील सीए मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, बुरोंडी नाका, लाल कट्टा, नर्सरी रोड, आझाद मैदान असा ५ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. तसेच दापोलीतील पहिले सीए संदिप खोचरे, पहिल्या महिला सीए सौ अनुराधा परांजपे, सीए किरण परांजपे, सीए श्रेयस काकिर्डे, सीए सौ अंजली फाटक, सीए कौस्तुभ दाबके, सीए मुनाझ्झा शेख, सीए ऋषिकेश शेठ इत्यादी सायकल चालवत सहभागी झाले होते. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली सीएची परीक्षा, आर्थिक क्षेत्रातील विविध माहिती, इत्यादींबद्दलचे मार्गदर्शन या सर्वांनी गप्पा गोष्टी करत केले. भारताच्या प्रगतीमध्ये यांचे मोठे योगदान आहे, सीए दिवसाच्या या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. सायकल फेरी मार्गावरील काही मान्यवर डॉक्टरांना भेटून डॉक्टर दिवसाच्या पण शुभेच्छा देण्यात आल्या.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात राजेशकुमार कदम, प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, केतन पालवणकर, बाळासाहेब नकाते इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.