नवी दिल्ली:-भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत विराट कोहलीने आयसीसी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक मोठी घोषणा केली आहे. आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले.दरम्यान, हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी वैयक्तिक रित्याही भावूक ठरला. त्याने अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. ही खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. तो या सामन्याचा सामनावीरही ठरला. पण सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर विराट अत्यंत भावूक झाला होता. त्याने या पुरस्कार जिंकल्यानंतर सांगितले ‘हा माझा शेवटचा टी२० वर्ल्ड कप आहे. हेच आहे जे आम्हाला मिळवायचे होते. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटते की तुमच्या धावा होत नाहीये आणि मग हे असं होतं.
ईश्वर महान आहे. आत्ता नाही, तर कधीच नाही, अशी परिस्थितीत होती. हा माझा भारतासाठी शेवटचा टी२० सामना आहे. आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होते. हे असं नाहीये की आम्ही जर हरलो असतो, तर मी घोषित केले नसते. हे ठरलेलं होतं. आता पुढच्या पिढीने टी२० क्रिकेट पुढे नेण्याची वेळ आहे आणि चमत्कार घडवण्याची वेळ आहे, जे आम्ही आयपीएलमध्ये पाहिले आहे. मला यात काहीच शंका नाही, ते तिरंगा उंच फडकावतील. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली होती. मी फक्त एकटा नाही, तर तुम्ही रोहितकडेही पाहा, त्याने ९ टी२० वर्ल्ड कप खेळले, हा माझा सहावाच होता. संघातील प्रत्येकाप्रमाणेच तो या विजयासाठी पात्र होता. आम्ही जिंकलोय, याचा आनंद आहे. जेव्हा ईश्वराला तुम्हाला काहीतरी द्यायचे असते, तेव्हा तुम्ही कल्पनाही केलेली नसेल अशा मार्गाने तो ते देतो. मी खूप कृतज्ञ आणि नम्र आहे. हे सर्व कठीण होते आणि म्हणूनच भावना व्यक्त झाल्या. आम्ही शानदार पुनरागमन केले. मी यापेक्षा आणखी काही जास्त मागू शकत नाही.’